Pune District : निष्ठावान कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणार : अतुल बेनके

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) जो कार्यकर्ता आजपर्यंत सन्मानाने, मनापासून आणि निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिला त्यालाच पुढे घेऊन जाण्याची पक्षाची तयारी आहे, असे प्रतिपादन जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. सत्तेत असो अथवा नसो, निवडणुकीत पराभव झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा व नाळ तुटू द्यायची नाही असे संस्कार व शिकवण स्वर्गीय वल्लभ बेनके यांनी दिली असल्याचे नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्नर नगरपंचायत साठी 20 नगरसेवक व 1 जागा नगराध्यक्षाची आहे.
निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी प्रत्येकी दोन ते तीन इच्छुक उमेदवारांची नावे प्राप्त झाली आहेत. काहींनी तर पोस्टर लावून प्रचारालाही सुरुवात केली आहे.आघाडी अथवा युती करताना राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. सर्वच उमेदवार ताकदीचे आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडे जुन्नर नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची क्षमता आहे. तशी तयारी असून त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज पर्यंत एकाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही. इच्छुक उमेदवारांची निवड जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ नेते करतील. इतर पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करुन सदस्यत्व घ्यावे. त्यानंतरच वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचा निर्णय घेतला जाईल
जुन्नर नगरपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक हट्ट असलेल्या उमेदवारांनी 10 तारखेपर्यंत फॉर्म भरून द्यावेत. अंतिम मतदार यादीत काही बदल झाले असल्याचे बोलले जात आहे, परंतु त्याची माहिती सीईओंकडून घेतली जाईल. मतदार यादीत बदल झालेले असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल.
अन्यथा पायउतार व्हावे लागेल
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण व शहरी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेतला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझ्यासहित सर्व नेतेमंडळी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या पदावर काम करीत आहेत. त्या सर्वांना या निवडणुकीत काम करावे लागेल अन्यथा त्यांना पाय उतार कसे करायचे, याचा विचार केला जाईल.
फोटो ः अतुल बेनके





