Eknath Shinde : सध्या राज्यात नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांना दोन महत्वाच्या पदांवर पायउतार व्हावे लागले. त्यानंतर अनेक नेते रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या घडामोडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात फेरबदल करणार असल्याची चर्चा आहे. दोन मंत्र्यांना नारळ दिला जाऊ शकतो. या दोन मंत्र्यांवर शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि 2 मंत्र्यांवर जिल्ह्यात पक्षाची कमी होत असलेली ताकद पाहता एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराजीची चर्चा का? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आलेले निकाल. त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही काही मंत्र्यांना आपला गड राखता आला नाही. एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन मंत्र्यांचा पत्ता मंत्रीमंडळातून कट होऊ शकतो. तर पक्षासाठी झटणाऱ्यांना मंत्रीपदाची लॅाटरी लागू शकते. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जावू शकतो, अशी माहिती सूत्रांची आहे. त्यानुसार आता मंत्री पदासाठी जोरदार लॅाबिंग सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. दीपक केसरकर यांना पक्षातील वरिष्ठांकडून समज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकतीच दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना पक्षातील वरिष्ठांकडून समज देण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. हेही वाचा : Weather alert : पुढील 24 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता; कुठे येलो तर कुठे अॅारेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्याला कोणता इशारा? वाचा..