नवी दिल्ली – शिवसेना आमदार ( Shivsena mla ) अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून ( Supreme Court ) वेळ वाढवून देण्यात आली आहे. अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. त्यावर न्यायालयाने तीन आठवड्यांचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ( Rahul Narvekar )
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. तुषार मेहता ( Tushar Mehata ) यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, माननीय न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष २८ डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करणार असून निकाल देण्यासाठी त्यांना काही वेळ हवा आहे. २ लाख ७१ हजार पानांचे सबमिशन असल्यामुळे लगेच निकाल देणे शक्य होणार नाही. सध्या अध्यक्ष सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुनावणी घेत आहे. निकाल देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा.
दुसरीकडे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र वेळ वाढवून मागण्याच्या मागणीचा विरोध केला. हा वेळकाढूपणा करण्याचा प्रकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. या युक्तिवादानंतर निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष २८ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करणार असल्याचा शब्द देत आहेत. तसेच त्यांना निकाल देण्यासाठी पर्याप्त वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांना दहा दिवसांची मुदत वाढवून देत आहोत. अध्यक्षांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत आपला निकाल द्यावा.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. याप्रकरणी निकाल देण्यास दिरंगाई केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच हे प्रकरण निकाली काढण्यास नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. परंतु, निकाल वेळेत देता येणार नसल्याने नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली.