मुंबई : राज्यातील महापालिका निवडणूकांची धुमश्चक्री सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु झालेली आहे. देशातील महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष्य लागले असता, उद्धव व राज यांनी आपण एकत्र लढणार असे जाहीर केले आहे. दुसऱ्या बाजूला भाजप व शिंदेसेना यांनी देखील आपला स्वतंत्र गट करताना निवडणूकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. कॉंग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला किमान मुंबईत तरी एकाकी निवडणूक लढवावी लागू शकते, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. उद्धवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येताना महाविकास आघाडीची स्थापना केली होती. मात्र सध्याच्या घडीला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा मुंबई महानगरपालिका निवडणूकीमध्ये उद्धवसेना व मनसे यांच्यासह निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. यासाठीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मातोश्रीवर चर्चेसाठी गेले होते. तब्बल २ तास सकारात्मक चर्चा झाली असली तरी चर्चा अजूनही निष्कार्षापर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, आमची चर्चा अजूनही सुरु आहे. उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी मी मुद्दाम आलो होतो. चर्चा बरीच झाली असली तरी अजूनही आम्ही निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नाहीत. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. खरे तर या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावू अशी आमची धारणा होती. मात्र मुंबईमध्ये ते दोन्ही पक्ष मोठे आहेत. त्या दोन्ही पक्षांएवढी ताकद मुंबईत आमच्याकडे नाही. त्यामुळे चर्चेसाठी आम्ही आलो आहोत, असे जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चर्चेतून मार्ग काढू मुंबईतील भांडूप व विक्रोळीच्या काही जागांचा तिढा निर्माण झाला आहे. त्या जागा कॉंग्रेसला अपेक्षित आहेत. मात्र तेथील नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत, यासंदर्भात विचारणा केली असता, पाटील म्हणाले की, काही सिटींग नगरसेवक मागील वेळी निवडून आले आहेत, ते सध्या आमच्यासोबत असल्याने, त्या जागा आम्हाला मिळाव्यात असे आम्हाला वाटते, परंतू यावर देखील आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.