मुंबई : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते म्हणजे तीन हजार रुपये मतदानाच्याआधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकांप्रमाणे महापालिकेचा निकालातही ‘लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरणार की काय अशी चर्चा सुरू आहे. मकरसंक्रातीपूर्वी महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. आता ती मुदत संपली असल्याने केवायीस केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीच्याआधी पैसे जमा होत असल्याने महायुतीमधील तीनही पक्षांकडून महिलांसाठी आम्ही ही योजना राबवली असे सांगत लाभ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमधी मित्रपक्ष काही ठिकाणी एकत्र लढत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या योजनेचा श्रेय घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही मित्रपक्षांमध्ये चढाओढ लागणार आहे. बिहार राजकारणाचे अनुकरण बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांच्या खात्यात एका योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्याचा फायदा सत्ताधा-यांना झाला. भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा भाजपमध्ये आले. त्याच प्रकारे एकदम तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले तर त्याचा फायदा सत्ताधा-यांनाच महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.