भोपाळ – मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील आधीच्या कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फेर आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंत्र्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे.
या आधीही यासाठी एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला होता, पण आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्याने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटात गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, वाणिज्य कर मंत्री जगदिश देवडा, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री बिसहुलाल सिंह आणि कामगार मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे.
कमलनाथ सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहणारे गोविंद राजपूत यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. प्रदेश भाजपचे प्रवक्ते रजनीश आगरवाल यांनी सांगितले की, कमलनाथ सरकारने घेतलेले निर्णय करोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या पूर्वीच्या काळातील आहेत. आता करोनामुळे राज्याची एकूणच स्थिती बदलली असून त्यामुळे या निर्णयांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.