Rahul Narwekar | विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
आज दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यासाठी नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यातच आता राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सोमवारी राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील.
मुंबईत विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्य सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यानंतर उद्या 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला विधानसभा अध्यक्ष निवडणूक अर्ज दाखल केला. तर या मुदतीत महाविकासाआघाडीने एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ही भेट विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीसाठी असल्याची चर्चा आहे. विधानसभा उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांकडे दिले जाते. मात्र, मागील काही सरकारच्या कार्यकाळापासून यात खंड पडला आहे.