एमएसपीसाठी सरकारवर दबाव टाकणार : राहुल गांधी

नवी दिल्ली : शेतमालासाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्यासाठी इंडिया आघाडी केंद्र सरकारवर दबाव टाकेल, अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. शेतकरी नेत्यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी भूमिका मांडली. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून एमएसपीसाठीच्या कायदेशीर हमीचे आश्वासन देण्यात आले.
त्या विषयाचे आम्ही पूर्ण अवलोकन केले. तो विषय मार्गी लावणे शक्य आहे, असे ते म्हणाले. एमएसपीसाठी कायदेशीर हमी शेतकऱ्यांचा हक्क आहे. इंडिया आघाडी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्क मिळवून देईल, असा निर्धार राहुल यांनी नंतर सोशल मीडियामधील पोस्टमधून व्यक्त केला. राहुल आणि शेतकरी नेत्यांमधील भेटीविषयी कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्र सरकारविषयी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी राहुल हे आशेचा किरण आहेत, असे भाष्य त्यांनी केले. आता एमएसपीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस आणि इंडिया आघाडी सज्ज होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.





