प्रशांत किशोर करणार तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश?
Updated On:

कोलकता :जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना पश्चिम बंगालमध्ये उधाण आले आहे. तृणमूलनेही किशोर यांनी तसा निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याच्या उद्देशातून तृणमूलने याआधीच किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
किशोर यांच्याप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकाला कडाडून विरोध करत आहेत. त्या समान धाग्यामुळे तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय किशोर घेऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.





