‘पीएमपीएल’ कर्मचाऱ्यांचे तिकीट फाडणार?
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएल) प्रवासी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मागील महिनाभरापासून सेवा बंद असल्याने पीएमपीला रोज मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात पीएमपीएलकडून केवळ अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे. यातून पीएमपीएलला रोज केवळ एक ते सव्वालाख एवढेच उत्पन्न प्राप्त होते. तर इतर होणारा खर्च मोठा आहे. आर्थिक स्थिती बिकट झाल्याने महामंडळाने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी केवळ पीएमपीएलच्या कायम कर्मचाऱ्यांना काम देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर, बीआरटी मार्गावर देखरेखीसाठी नेमणूक केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याशिवाय सुरक्षा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या देखील नियुक्त्या रद्द करण्याचे सांगितले आहे.
पीएमपीएल ताफ्यात सुमारे 2 हजार 100 कर्मचारी रोजंदारीवरील आहेत. या कर्मचाऱ्यांना आता काम मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी या महिन्यातील वेतन मिळणार का? असा प्रश्न रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना पडला आहे. कर्मचाऱ्याचे वेतन कपात करू नये, असे आवाहन कामगार आयुक्त विभागाने केलेले असल्याने पीएमपीएलने रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही वेतन द्यावे, अशी भावना व्यक्त होत आहे.





