सेवा सुरू झाली तर पीएमपी स्टार्ट होणार का?

दोन महिने जागेवरच उभ्या; देखभालीकडे दुर्लक्ष
कात्रज / पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. शहर तसेच उपनगरांत धावणाऱ्या जवळपास दोन हजार बस जागेवरच उभ्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत बसची देखभाल दुरुस्ती झालेली नाही प्रवासी सेवा चालू करताना अनेक बस “स्टार्ट’ होतील की नाही, याबाबत वाहक कर्मचारीच शंका व्यक्त करीत आहेत.
पुणे शहर तसेच उपनगरातील कोणत्याही भागात पीएमपी बस बंद पडल्याचे चित्र कित्येकदा अनेकांनी पाहिले आहे. बसने प्रवास करणाऱ्यांनी तर हा अनुभव घेतलेलाच आहे. धावणाऱ्या अनेक बसची अवस्था खुळखुळ्यासारखी झाली आहे.
त्यातच आता गेली दोन महिने बस स्थानकातच उभ्या आहेत. शहर तसेच उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही अत्यावश्यक सेवांसाठीची एखादी दुसरी गाडी धावताना दिसते. शहर तसेच उपनगरांतील 13 डेपोंपैकी केवळ सहा डेपो काही प्रमाणात सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, पीएमपीकडे 2200 पेक्षा अधिक बस आहेत. यापैकी 125 ते 150 बस सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी वापरल्या जात आहेत. पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या मिळून दोन हजार बस जागेवरच उभ्या आहेत. ठेकेदारांच्या बसची जबाबदारी नसली तरी पीएमपीने त्यांच्याकडील उर्वरित बसची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु, दोन महिन्यांपूर्वी बस जागेवरच उभ्या असल्याने सेवा चालू होताना बस सुरू होण्याबाबत शंकाच असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष…
पीएमपीकडे दहा हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी 1100 कर्मचारी आलटून पालटून अत्यावश्यक सेवा देत आहेत. उर्वरित कर्मचारी रजेवर आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना बोलावून बसच्या देखभालीचे काम होणे गरजेचे होते.





