महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती
उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांसोबत बैठक
पुणे – गेल्या आठवडाभरापासून झालेली कचराकोंडी फुटण्याची चिन्हे असून, बुधवारपासून शहरातील कचरा उचलला जाणार आणि उरळी देवाची येथे कचरा गाड्या अडवल्या जाणार नाहीत, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी दिले.
आठवडाभरापासून फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांकडून महापालिकेच्या कचरा संकलनाच्या गाड्या अडवल्या जात होत्या. परिणामी शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. परंतु ग्रामस्थांसोबतची बैठक यशस्वी होईल. त्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर
महापालिकेकडून तातडीने कचरा उचलण्याचे काम मार्गी लागेल, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
महापालिका मुख्य सभेत मंगळवारी हा प्रश्न सदस्यांनी चांगलाच उचलून धरला.
सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. परंतु या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून महापौरांनी मुख्य सभा श्रद्धांजली प्रस्तावानंतर तहकूब केली. त्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
परंतु महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मुख्य सभेनंतर महापौर, उपमहापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये ग्रामस्थांसोबत बैठकीनंतर शहरातील कचरा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले.