पुणे | पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील नदीकाठच्या नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरवर्षी नदीकाठच्या नागरिकांना पुराचा फटका बसतोय. मात्र, यापुढे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. तुमचा हा लाडका भाऊ पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार आहे.
तुम्ही फक्त जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले.
शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, विश्रांतवाडी येथील शांतीनगर, सिंहगड रस्त्यावरील एकता नगर, निंबज नगर आणि डेक्कन परिसरातील पुलाची वाडी आदी परिसरातील नागरिकांना पुराचा फटका बसला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पूरग्रस्त भागांची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलन गोर्हे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
सिंहगड रोडवरील एकतानगरी येथील पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची शिंदे यांनी पाहणी केली. तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्यानंतर खडकवासला धरणाची मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचा जोर जास्त असल्याने सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठ परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. या पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले. त्यांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत.
विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. मी आज परिस्थिती बघण्यासाठी आलो आहे. त्याचे योग्य प्रकारे नियोजन करू, फक्त तुम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची आहे. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी सज्ज आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.





