Operation Lotus | आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद समोर आले आहेत. भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने महायुतीतील नाराजीच्या चर्चेला अधिकच बळकटी मिळाली आहे. मात्र दिल्लीतील भेटीवेळी अमित शाह शिंदेंना यांना जुमानले नसल्याची टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. याशिवाय भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. सामना अग्रलेखात काय ? शिंदेंच्या नाराजी नाट्याचा तिसरा अंक देखील सुरु झाला असल्याचा दावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच आता उगवलं आहे. भाजपला शिंदे नकोसे झाल्यामुळे त्यांची जागा दाखवण्याचा कार्यक्रम ‘लोटस’ सुरु झाला आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचे हे महानाट्य कोसळून पडणार आहे, असे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’त म्हंटले आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे. ‘रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली’ या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे. Operation Lotus | भाजपला शिंदे नकोसे झाले एकनाथ शिंदे यांनी जी नीती वापरून लोकं फोडली तीच नीती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वापरत आहेत. पाच, पंचवीस लाख देऊन शिंदेंनी माणसं फोडली आणि आता चव्हाण होलसेल भावात ती माणसं विकत घेत आहेत. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाल्याचा दावा देखील ‘सामना’तून करण्यात आला आहे. Operation Lotus | अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटीची खिल्ली देखील ‘सामाना’तून उडवण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, शिंदे यांनी शाहांकडे आपली माणसं पैसै देऊन फोडली जात असल्याची तक्रार केली. त्यावेळी शाहा यांनी हसून म्हटले की, ‘कोण कोणाचा पक्ष फोडत आहे. आम्ही तुमचा पक्ष फोडून बनवला आहे. तुम्ही फुटलात.’ एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम? दरम्यान, संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले. मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. त्यावरुन ठाकरे गटाकडून शिंदेंवर टीका केली जात आहे. यावरून शिंदे यांची नाराजी कायम असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. यातच सामना अग्रलेखातून केलेल्या दाव्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा: patan: पाटण तालुक्यातील कामांसाठी 34 कोटींचा निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी