‘दबावाखाली झुकणार नाही’; व्यापार करारावर गोयल यांचं ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : व्यापार कराराच्या मुद्यावर भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली झुकणार नाही, असं स्पष्ट करतानाच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश दिला आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित ‘बर्लिन ग्लोबल डायलॉग’मध्ये बोलताना गोयल यांनी हे ठामपणे सांगितलं.
‘बंदूक ठेवून’ करार नाही –
गोयल यांनी स्पष्ट केलं की, भारत चर्चेसाठी नेहमीच तयार आहे, पण कोणत्याही प्रकारच्या मुदतीचं बंधन किंवा दबावाखाली कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. पीयूष गोयल म्हणाले, “आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करत आहोत, पण आम्ही घाईघाईत करार करत नाही आणि कोणाच्याही डोक्यावर बंदूक ठेवून आम्ही कोणताही करार करत नाही.”
व्यापारी चर्चांमध्ये आता ‘वेळेची मर्यादा’ (डेडलाइन) आणि ‘टॅरिफ‘ महत्त्वाचे ठरतात, असं मॉडरेटरने नमूद केल्यावर गोयल यांनी भारताच्या दीर्घकालीन धोरणावर भर दिला. भारत ‘दीर्घकाळचा विचार’ करतो. आम्ही दबाव किंवा घाईत निर्णय घेत नाही. जर आमच्यावर टॅरिफ (आयात शुल्क) लादले गेले, तर आम्ही नवीन बाजारपेठा शोधतो आणि देशांतर्गत मागणी मजबूत करतो. आमची अर्थव्यवस्था खूप लवचिक आहे. असे गोयल म्हणाले.
रशियन तेल खरेदी आणि ट्रम्प यांचा दावा –
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि युरोपीय युनियन भारताला रशियन तेल खरेदी न करण्याची विनंती करत आहेत, कारण यामुळे युद्धाला आर्थिक मदत होते, असं त्यांचं म्हणणं आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच असा दावा केला होता की, भारताने रशियन तेलाची खरेदी कमी करण्यावर सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “महान व्यक्ती” म्हणत, दोन्ही देश “काही करारांवर काम करत आहेत” असे संकेत दिले होते.
भारताकडून दावा फेटाळला –
मात्र, भारत सरकारने ट्रम्प यांचा हा दावा तत्काळ फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “मला दोन्ही नेत्यांमधील अशा कोणत्याही चर्चेची माहिती नाही.” भारताने पुन्हा स्पष्ट केलं की, देशाचं राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षा लक्षात घेऊन तेल आयात धोरण ठरवलं जातं.
$५०० अब्ज व्यापाराचं लक्ष्य –
काही मतभेद असले तरी, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा हळूहळू पुढे सरकत आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार $५०० अब्ज (५० हजार कोटी डॉलर) पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. अमेरिकेचे राजदूत-नामित सर्जियो गोर यांनी नुकतेच वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.





