अपप्रवृत्तींना भीक घालणार नाही : आ. काळे

कोपरगाव -कोपरगाव मतदारसंघाचा होत असलेला विकास आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटत असल्याचे काहींना सहन होत नाही. त्यामुळे विकासात राजकारण आणून विकासालाच आडवे येण्याचा प्रयत्न होत असला, तरी विकासाआड येणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना आजपर्यंत कधीही भीक घातली नाही व यापुढेही घालणार नाही, अशा शब्दांत आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथे जलजीवन मिशन अंतर्गत 60 लाख 85 हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ व नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत 9 लाख 75 हजार रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, संचालक शंकर चव्हाण, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, विष्णू शिंदे, पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधुजी कोळपे, अर्जुन काळे, आनंद चव्हाण, मच्छिंद्र दहे, भिवराव दहे, धर्मा दहे, बाळासाहेब पवार, नंदकिशोर औताडे, विक्रम बाचकर, शिवाजी दहे, धनराज पवार, भानुदास दहे, बाबासाहेब होन, अक्षय दहे, मंसालाल दहे, योगेश दहे, केशवराव दहे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता चांगदेव लाटे, शाखा अभियंता अश्विन वाघ, राजेंद्र दिघे, ग्रामसेवक महेश काळे आदी उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले की, सार्वजनिक विकासकामांचा फायदा हा मर्यादित नागरिकांना होत नसून तो सर्व नागरिकांना होत असतो. त्यामुळे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देताना कधीही दुजाभाव केला नाही आणि करणार नाही. मात्र, नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करून कुठे तरी विकासकामात आडवे यायचे असा काहींना छंद असतो. जनतेने संधी देऊनदेखील त्यांना विकास करता आला नाही. अशा विघ्नसंतोषी प्रवृत्ती विकासाच्या आड येण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसून आता परिस्थिती बदलली आहे. जशास तसे उत्तर देण्याची आमची नेहमीच तयारी असते हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, अशी तंबी या वेळी आ. काळे यांनी दिली.
सरकार बदलले असले तरी विकास कामे थांबणार नाही. सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी होत असलेला पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील. विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील सत्ताधारी पक्षाकडून निधी आणण्यासाठी बांधील असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
या वेळी कोल्हे गटाचे बाजीराव होन, दादासाहेब दहे, दीक्षित दहे, संदीप दहे, सुनील होन, आप्पासाहेब ढमाले, दौलत दहे, सचिन ढमाले, राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आ. आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.





