जेजुरी : भाजप विचारांचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास शहरातील विकासकामांसाठी कोणताही निधी अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. जेजुरीतील विविध विभागांतील भाजप समर्थित उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जेजुरी शहरात आवश्यक असलेल्या पाणी, वीज, रस्ते आदी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता येईल. राज्य शासनाची लाडकी बहीण योजना सर्व समाजातील महिलांना कोणताही जात-धर्म न पाहता देण्यात येत असून, ही योजना सामान्य बहिणींसाठी आशेचा किरण ठरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून खंडोबा मंदिरात बंद असलेली पाद्यपूजा निवडणुकीनंतर पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून ही परंपरा पुनर्स्थापित केली जाईल आणि त्यामुळे सर्व समाजातील भक्तांना या धार्मिक विधीचा लाभ घेता येईल. जेजुरीच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक ओळखीला नवी ऊर्जा मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रचारसभेत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार – सचिन सोनवणे, सोनाली चौंडकर, नरेंद्र पवार, अॅड. दीप्ती जोशी, ईश्वर दरेकर, विना सोनवणे, सागर हरपळे, अनिकेत भालेराव, रोहिणी बारसुडे, वर्षा कोशे, सदानंद बारबाई, जयदीप भापकर, प्रज्ञा कांबळे, कुमार गावडे, गणेश डोंबे, प्रियंका देशमुख, काजल दोडके आणि गणेश शिंदे – यांच्या समर्थनार्थ मोठ्या उत्साहात पदयात्रा व सभा पार पडली. कार्यक्रमाला माजी आमदार अशोक टेकवडे, भाजप नेते बाबाराजे जाधवराव, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे, तसेच सचिन लंबाते, गणेश भोसले यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. जेजुरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापू लागले असून, भाजप नेत्यांच्या आश्वासनांमुळे प्रचाराला वेग आला आहे. विमानतळामुळे संधी माजी आमदार संजय जगताप यांनीही जेजुरीच्या विकासाबाबत मनोगत व्यक्त केले. पुरंदर तालुक्यात उभारला जाणारा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण परिसराच्या वाढीसाठी संधी असल्याचे सांगत, जेजुरीचा नवीन डीपीआर तयार करून शहराची हद्द वाढवणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. विमानतळामुळे वाढणार्या लोकसंख्या व उद्योगांच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत पायाभूत सुविधा आणखी बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.