वासुंद्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – लंके

पारनेर – आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून वासुंदे गावात जवळपास 10 कोटींवर विकासकामे झाली असून, या पुढील काळातही गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणी लंके यांनी दिले. मृद व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून वासुंदे गावातील शिर्के मळा येथील पाझर तलावासाठी आ. लंके यांच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाच्या प्रारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी लंके म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधांबरोबर जलसंधारणच्या कामांनासुद्धा या पुढील काळात आ. नीलेश लंके यांनी प्राधान्य दिले असून, या पाझर तलाव दुरुस्ती कामाचा वासुंदे व परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा आशावादही लंके यांनी व्यक्त केला.
या वेळी गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे, ग्रा. पं. सदस्य पोपटराव साळुंके, भागुजी दादा झावरे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष रा. बा झावरे, जगदीश गागरे, शेरूशेठ रोकडे, गजानन झावरे, संजीवनी शिर्के, बबनराव गांगड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शरद झावरे, शाखा उपअभियंता सोनवणे, सुदाम शिर्के, रावसाहेब बर्वे, अमोल उगले आदी उपस्थित होते.




