मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रात एका महिलेला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कोणत्या महिलेला राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर पाहायचे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. आता राज्यात आमची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर एका महिलेने बसावे’. असं ते म्हणाले आहे. दरम्यान, ठाकरेंच्या या व्यक्तव्यानंतर महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चांना उधाण आले असून राजकीय वर्तुळात देखील अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. मात्र, अश्यातच नुकत्याच शिवसेनेत पदार्पण केलेल्या सुषमा अंधारे यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अतिशय स्पष्ट व्यक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी नाही. राज्यात इतरही अनुभवी महिला नेत्या आहेत. त्या मुख्यमंत्री झालेल्या मला आवडेल. मी पक्षात सध्या शेंडेफळ असून पक्ष बांधणी हेच सध्याचं उद्दिष्ट’ असल्याचं अंधारे म्हणाल्या आहे. तसेच, जर एकिकडे यूपीत एखादी महिला पाच वेळा मुख्यमंत्री होत असेल तर महाराष्ट्रात अशी मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही. ती संधी कुणाला द्यायची, हे पक्षप्रमुख ठरवलीत. असं देखील त्या म्हणाल्या आहेत. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.