१) मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मुंबईतील वरळी डोम येथे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे नव्याने घडवू, कोणत्याही धर्माशी वैर नसून, भारतविरोधी भूमिकेला विरोध असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच मुंबईतील सामान्य माणूस यापुढे मुंबईबाहेर जाणार नाही. त्यांच्या घराचा प्रश्न आम्ही सोडवतोय आणि प्रवासाचा दुसरा जटील प्रश्नही सोडवत असल्याचं सांगत नव्यानं मुंबई घडवू असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. २) तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात मराठी माणसाचं हित आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जुने वाद बाजूला ठेवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र आलेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसेने युती करून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेनेच्या मुख्यालय असलेल्या सेना भवनात आलेत. अनेक वर्षांनंतर सेना भवनात प्रवेश करताना राज ठाकरे भावनिक झाले. “मला २० वर्षांनंतर तुरुंगातून सुटून आल्यासारखं वाटतंय,” अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. नवीन शिवसेना भवन प्रथमच पाहत असल्याचं सांगताना, जुन्या भवनातील आठवणी मनात कोरलेल्या असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ३) ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा संयुक्त वचननामा जाहीर केलाय. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. परवडणारी घरे, ७०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी, महिलांसाठी मासाहेब किचन, घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी, १०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आलंय. तसेच शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, बहुभाषिक मोफत शिक्षण, आरोग्यासाठी पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये, रॅपिड बाईक अॅम्ब्युलन्स, वाहतुकीसाठी स्वस्त बेस्ट प्रवास, पर्यावरण रक्षण, कोळीवाडे व गावठाणातील बांधकामे नियमित करण्यावर भर देण्यात आलाय. हा वचननामा मुंबईसाठी गेमचेंजर ठरेल, असा दावा ठाकरे बंधूंनी केलाय. ४) अमित ठाकरेंसमोर सरवदेच्या चिमुकल्यांचा टाहो सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेसह 15 जणांवर गुन्हा दाखल असून 5 आरोपींना अटक करण्यात आलीय. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सरवदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी “माझे पप्पा मला आणून द्या… मी माझ्या पप्पांना भेटलेच नाही,” असा हृदयद्रावक टाहो बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरून गेले. ५) “निवडणूक आयोगाला ‘याबद्दल’ चिंता वाटतेय का?” : कपिल सिब्बल महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांबाबत खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच ६७ ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांनी चिंता व्यक्त केलीय. “निवडणूक आयोगाला याबद्दल काही चिंता वाटतेय का?” असा थेट सवाल सिब्बल यांनी केलाय. बिनविरोध निवड झालेल्या बहुतांश जागांवर भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पैसे देऊन आणि पोलिसी दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचे गंभीर आरोपही करण्यात आलेत. राज्यातील याच निकालांबद्दल खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला केलाय. ६) विमानात पॉवर बँक न्यायला परवानगी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक नेण्याच्या नियमात बदल केलाय. प्रवाशांना आता पॉवर बँक हँडबॅगमध्ये नेण्याची परवानगी देण्यात आलीय. मात्र उड्डाणादरम्यान पॉवर बँक वापरून मोबाईल चार्ज करता येणार नाही किंवा ती विमानाच्या सीटवरील पॉवर सिस्टिमला जोडता येणार नाही. लिथियम बॅटरीमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. ओव्हरहेड बिनमध्ये ठेवलेल्या पॉवर बँकांपर्यंत तातडीने पोहोचणे कठीण असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अट घालण्यात आलीय. १०० वॅट-तासांपेक्षा कमी क्षमतेच्या पॉवर बँकांनाच परवानगी असेल. ७) आता महागाईचा भडका उडणार? अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतल्याने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडालीय. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम जागतिक खनिज तेल बाजारावर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. व्हेनेझुएला हा कच्च्या तेलाचा मोठा साठा असलेला देश असून २०२५ मध्ये या देशाने दररोज सुमारे ९ लाख बॅरल तेल उत्पादन केले होते. सध्याच्या राजकीय अनिश्चिततेमुळे तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात वाढू शकतात. याचाच फटका तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांना बसण्याची शक्यता असून भारतालाही याचा परिणाम जाणवू शकतो. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून देशांतर्गत महागाईचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केलीय. ८) आसाममध्ये प्रियांका गांधीकडे महत्वाच्या पदाची जबाबदारी या वर्षी देशभरात तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका होणार आहेत. यासाठी काॅंग्रेस पक्षाने आसाममध्ये उमेदवार निवडीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी-वाड्रा यांची नियुक्ती केलीय. गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक राज्य विधानसभेतून मिळालेल्या नामांकनांमधून, सर्वोत्तम उमेदवार निवडणे हे त्यांचे काम असेल. उमेदवारांच्या या पॅनेलवरील अंतिम निर्णय काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीवर अवलंबून आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या व्यतिरिक्त, या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यासह आणखी दोन सदस्यांचा समावेश आहे. ९) ‘बॉर्डर 2’साठी सनी देओलने घेतले ५० कोटी मानधन १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्तांच्या सुपरहिट देशभक्तीपर ‘बॉर्डर’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘बॉर्डर 2’ सध्या जोरदार चर्चेतय. जवळपास तीन दशकांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह करत असून, ‘बॉर्डर 2’ २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारय. नुकतेच सिनेमातील ‘संदेसे आते है’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, सनी देओलने या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची माहिती समोर आलीय. ‘गदर 2’च्या यशानंतर सनी देओल पुन्हा लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कालरच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणारय. १०) IPL 2026 पूर्वी आरसीबीचे ‘टेन्शन’ वाढले आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला दुखापतींचे मोठे ग्रहण लागलेय. संघातील चार प्रमुख मॅचविनर खेळाडू सध्या वेगवेगळ्या दुखापतींनी त्रस्त असून फ्रँचायझीची चिंता वाढलीय. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला विजय हजारे ट्रॉफीदरम्यान दुखापत झालीय. सलामीवीर फिल सॉल्ट कंबरेच्या दुखापतीमुळे आयएलटीट्वेन्टीमधून बाहेर पडलाय, तर फिनिशर टिम डेव्हिड हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड देखील गेल्या नोव्हेंबरपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. मुख्य खेळाडूंच्या या दुखापतींमुळे आरसीबीच्या सराव मोहिमेला आणि नियोजनाला मोठा धक्का बसला असून, स्पर्धेपूर्वी हे खेळाडू तंदुरुस्त होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.