नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत भारताचा विकास दर वाढून 8.2% झाला आहे. यामुळे इतर पतमानांकन संस्थाप्रमाणे आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षाचा भारताचा विकास दर अंदाज पूर्वीच्या 6.5 टक्क्यावरून 7.2% इतका केला आहे. भारताच्या या वाढीव विकासदराचा आधार आशिया खंडाच्या विकासदराला मिळणार असून आशिया खंडाचा विकासदर या बँकेने 4.8% वरून 5.1% इतका होईल असे म्हटले आहे. पहिल्या तिमाहीचा विकास तर 7.8% होता. दुसर्या तिमाईचा विकास दर 8.2% इतका झाला आहे. त्यामुळे पहिल्या सहामाहीचा विकास दर आठ टक्के इतका झाला आहे. असे असले तरी केंद्र सरकार आगामी काळात पायाभूत सुविधा वरील खर्च वित्तीय तूट कमी करण्यासाठी मर्यादित करणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावल्यामुळे निर्यात कमी होणार आहे. अशा परिस्थितीत दुसर्या सहामाहीचा विकास दर कमी होऊन 7.3% होणार असल्याचे समजले जात आहे. बँकेने पुढील वर्षाचा म्हणजे आर्थिक वर्ष 2077 चा विकास दर मात्र 6.5% या पातळीवर कायम राहण्याचा अंदाज जाहीर केला आहे. दुसर्या सामाहीत सेवा क्षेत्राचा विकास दहा टक्क्यांच्या जवळपास राहील. मात्र मॅन्यफॅक्चरिंग क्षेत्राचा विकासदर निर्यातीचा आधार कमी होणार असल्यामुळे कमी होणार आहे. भारताने महागाई कमी पातळीवर ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये चालू वर्षात महागाईचा दर 3.1 टक्के राहील असे बँकेने म्हटले होते. आता हा अंदाज कमी करून 2.6 % इतका राहील असे म्हटले आहे.