उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू होणार ? मुख्यमंत्री धामी घेणार पुढाकार

नवी दिल्ली – पुष्कर सिंग धामी यांनी आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शपथ घेण्यापूर्वी पुष्कर सिंह धामी यांनी आश्वासन दिलं की, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, ज्यात समान नागरी संहितेचा समावेश आहे.
आपण पारदर्शक सरकार चालवणार असून निवडणुकीपूर्वी भाजपने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील, असं आश्वासन पुष्कर धामी यांनी दिले आहे. समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड) देखील यापैकी एक आहे.
निवडणुकीपूर्वी धामी यांनी त्यांच्या सभांमध्ये समान नागरी संहितेचा उल्लेखही केला होता. कायदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असून त्यात कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंत यांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले होते.
ते म्हणाले होते की, समान नागरी संहिता म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी एक समान कायदा असेल, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो. समान नागरी संहितेत विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेचे विभाजन याबाबत सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू असेल.
पुष्कर सिंह धामी यांच्या आज पार पडलेल्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यासोबतच भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्यात सहभागी झाले होते. धामी यांनी उत्तराखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून दुपारी 2.30 वाजता डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर शपथ घेतली.





