“कृष्णा’च्या कामगारांना चांगली पगारवाढ देणार

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; 6 लाख 35 हजार 1व्या पोत्यांचे पूजन
कराड – कृृृष्णा कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत संचालक मंडळ नेहमीच सकारात्मक राहिले आहे. सत्तेवर आल्याबरोबर कामगारांना टप्प्याटप्याने पगारवाढ देण्याबरोबरच उत्कृष्ट सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच कामगारांना चांगली पगारवाढ दिली जाणार असून, कारखान्याचा एकही कामगार 10 हजार रूपये पगाराच्या खाली राहणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित साखर पोतीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्यात गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 6 लाख 35 हजार 1 व्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हाइस चेअरमन जगदीश जगताप, रणजीत पाटील, ऍड. बी. डी. पाटील, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, गिरीश पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, जयवंतदादा जगताप उपस्थित होते.
चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, महापुराचा फटका बसल्याने यंदा जवळपास एक महिना उशिरा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या 30-40 वर्षात उशिरा हंगाम सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्थितीत ऊसतोड करणे सोपे नव्हते.
पण सुयोग्य नियोजनामुळे कृष्णा कारखान्याने या आव्हानावर यशस्वीपणे मात केली. तोडणीबाबतच्या अनेक तक्रारींचा निपटारा करत, सर्वांना न्याय दिला. सध्या साखरेचे भाव पडले असून, गेल्या दोन वर्षांपासून साखर उद्योगात मंदीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून सरकारने साखर निर्यातीसाठी सहकार्य करण्यास प्रारंभ केला आहे. पण या स्थितीतून लवकर बाहेर येण्यासाठी सरकारने साखर निर्यात धोरणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, जेणेकरून साखरेला चांगला भाव मिळू शकेल.
संपूर्ण साखर एकदम विकली जात नसल्याने सर्वच कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे कर्ज काढूनच द्यावे लागतात. आपल्याकडे अजूनही साखर शिल्लक असल्याने साखर विक्रीसाठी सरकारची मदत आवश्यक असून, सरकारने सर्वच साखर कारखान्यांना तशी मदत देण्याचे धोरण आखावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
बाळासाहेब पाटील यांनी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी स्थापन केलेल्या आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध संस्थांमुळे वाळवा व कराड तालुक्यात समृद्धी आली असल्याचे गौरवोद्गार काढले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या कामगार वर्गासाठी आजचा दिवस सोन्याचा आहे. सुरेशबाबांचा बोलण्यापेक्षा कृतीवर भर असतो. त्यामुळे पगारवाढीबाबत त्यांनी कामगारांना दिलेली ग्वाही ते प्रत्यक्षात आणतील, याची आम्हाला खात्री आहे.
कार्यक्रमाला माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, मलकापूरचे नगरसेवक अजित थोरात, आबासो सोळवंडे, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, राजू मुल्ला, अण्णा काशीद, माजी पं.स. सदस्य सुनील पोळ, बबनराव शिंदे, प्रकाश पाटील, संग्राम पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, गजेंद्र पाटील, हेमंत पाटील, शिवाजीराव चव्हाण, सर्जेराव थोरात यांच्यासह अधिकारी, कामगार व शेतकरी उपस्थित होते.





