सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना दिलासा मिळणार ? उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई –सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने नुकताच दिला. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका बुच यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उद्या (मंगळवार) सुनावणी होईल. त्यामुळे बुच यांना दिलासा मिळणार की त्या चौकशीच्या रडारवर येणार ते स्पष्ट होईल.
बुच यांच्यासह ६ जणांविरोधात आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचार आणि नियामक उल्लंघन केल्याच्या आरोपाची तक्रार दाखल करण्यात आली. त्या कथित शेअर बाजार घोटाळ्याची दखल विशेष न्यायालयाने घेतली. तसेच, बुच आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिला.
आरोप झालेले प्रकरण १९९४ यावर्षी शेअर बाजारात एका कंपनीची लिस्टिंग फसवणुकीच्या मार्गाने झाल्याच्या दाव्याशी संबंधित आहे. संबंधित कंपनी लिस्टिंगसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यास समर्थ नव्हती, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासंबंधी विशेष न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल ठरवावा, अशी मागणी करणाऱ्या याचिका बुच आणि इतरांनी दाखल केल्या. संबंधित आदेश अवैध आणि मनमानी आहे. आदेश देण्यापूर्वी आम्हाला नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत. आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित आदेश कायदेशीर आधारावर टिकणारा नाही, अशी भूमिका याचिकांमधून मांडण्यात आली. त्या याचिकांवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होईल. तोपर्यंत एसीबीने आदेशाला अनुसरून कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.





