ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्याच प्रवेश?

मुंबई – दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. “शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील”, असा मोठा दावा उदय सामंत यांनी आज (२३ जानेवारी) माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच याचा पहिला टप्पा उद्या पार पडणार असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उद्या ठाकरे गटाच्या माजी आमदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. उदय सामंत यांच्या दाव्यामुळे राजन साळवी एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे.
उदय सामंत यांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
साळवी लवकर शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चाही रंगल्या आहेत. त्यातच उदय सामंत यांनी मोठा दावा केल्याने राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल का? हे उद्या स्पष्ट होईल.





