Prakash Ambedkar – सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग चालू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश दिल्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. पर्यायाने राज्यातील राजकीय पक्षदेखील कामाला लागले आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे. मंगळवारी त्यांनी धाराशिवमध्ये पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या या विधानाला आता महाविकास आघाडी नेमका कसा प्रतिसाद देते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पक्षपातळीवर आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा झाल्यानंतर या निवडणुकीबाबत काय भूमिका पुढे येते हे लवकरच स्पष्ट होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. दलित तसेच इतर बहुजन या पक्षाचे मतदार आहेत. त्यामुळे हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार असून यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या घटकपक्षांच्या रणनीतीत बदल करावे लागतील. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? प्रकाश आंबेडकरांना सकारात्मक प्रतिसाद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.