भोर : भोरमध्ये बेरोजगारीचा गंभीर प्रश्न असून येथील नागरिकांच्या हाताला काम नाही. यामुळे भोरची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी येत्या अधिवेशनात उत्रौली एमआयडीसीचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले. भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांच्या नागरी सत्कार व मेळाव्याचे आयोजन भोर-राजगड-मुळशी तालुक्यातर्फे केले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, संतोष घोरपडे, माजी आमदार शरद ढमाले, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे,यशवंत डाळ, जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, केदार देशपांडे, सचिन कन्हेरकर, गणेश म्हसुरकर, सुनील गायकवाड, दशरथ जाधव, सुनील भेलके, नितीन थोपटे, प्रा.बी. डी. गायकवाड, केदार देशपांडे, सतीश चव्हाण, किरण राऊत, संदीप खुटवड, माऊली खुटवड, मनोज खोपडे, रणधिर खोपडे, अशोक शिवतरे, सुरेश साळुंके, गणेश निगडे, दीपाली शेटे, प्रकाश तनपुरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते. शंकर मांडेकर पुढे म्हणाले की, शिंदेवाडी ते भोर यादरम्यान दहा मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु यामध्ये वाढ करून चार पदरी रस्ता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भोर तालुक्यात रस्त्याची रुंदी छोटी आहे. यासाठी हे रस्ते मोठ्या रुंदीचे करणार असून भोरचा विकास व्हावा या हेतूने विकास आराखडा तयार करणार आहे. लवकरच रायरेश्वरावर ४० फूट उंचीवर भगवा फडकणार आहे. तसेच हे काम झाल्यानंतर तोरणा व राजगडावरही असाच भगवा फडकवण्याचे काम करणार असल्याचे मांडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकर यांचा पुणेरी पगडी,शाल श्रीफळ बुके देवून नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, जीवन कोंडे, गायकवाड यांची विजयाची कारण मिमांसा करणारी भाषणे झाली.