शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार : संजय राऊत

मुंबई : सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत असल्याचे मला दिसले. त्यामुळे मी हा मुद्दा उपस्थित केला. आज मला 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड आदी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मला 15 दिवसच काय 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी खरे बोलणे थांबवणार नाही.
माझगाव कोर्टाने आमचे पुरावे फेटाळले. त्यामुळे आम्ही या शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार आहोत. तिथे या प्रकरणातील सर्व पुरावे सादर केले जातील, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
आमच्यासारख्यांचे दावे फेटाळले जात आहेत. कारण सद्यस्थितीत न्यायव्यवस्थेचे खालपासून वरपर्यंत संघीकरण झाले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे मोदक खायला आपल्या घरी पंतप्रधानांना बोलावतात आणि पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जातात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवालही संजय राऊत यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.





