बारामती, (प्रतिनिधी)- बारामती शहरातील एमआयडीसीत तरूणांच्या हाताला जादा काम देण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी मोठ्या कंपन्या आणणार आहे, अशी ग्वाही विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिली.
बारामतीमधील नामांकित योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी या प्रोडक्शन हाऊसच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री निलेश काळे बिजनेस कोच पुणे यांचे व्यवसायातील सिस्टीम व प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन व उद्योजक मित्रांचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास युगेंद्र पवार हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, योद्धा प्रोडक्शन हाऊसने फक्त आठ वर्षात महाराष्ट्रभर पोहोचून कमी कालावधीत जी दैदीप्यमान कामगिरी केली आहे याचा मला व बारामतीकरांना सार्थ अभिमान आहे.
उद्योजकांना एकत्र करून अशा प्रकारे मार्गदर्शन मेळावे घेणे हे कौतुकास्पद आहे, येत्या काळात शरद पवार यांना सांगून बारामतीमध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी योद्धा प्रोडक्शन हाउसच्या वतीने योद्धा उद्योजक सन्मान 2024 देण्यात आले. यामध्ये अनुक्रमे विशाल तुपे संचालक स्वप्नपूर्ती अकॅडमी, सतीश खारतोडे यशवंत बिजनेस ग्रुप, श्री जमादार ऑल सोल्युशन इंटरप्राईजेस, राजाराम सातपुते संचालक व्ही आर बॉयलर, सुजित कदम आर्टिक इंजीनियरिंग यांना योद्धा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नानासाहेब साळवे यांनी प्रास्ताविक केले. योगेश नालंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारामती बिजनेस चौकच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.