भाजप वरुण गांधींना उमेदवारी नाकारणार? तर असा असणार बी प्लॅन

Varun Gandhi| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून काही उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. मात्र, या यादीमधून पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
वरुण गांधींच्या जागी कोणाला मिळणार संधी?
कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये बहुतांश नेत्यांनी वरुण यांचे तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. वरुण यांचे सतत पक्षाविरोधात बोलणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे तिकीट डावलून त्यांच्या जागी योगी सरकारमधील मंत्री जितीन प्रसाद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
…तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार Varun Gandhi|
भाजपने वरुण गांधी यांना पिलीभीत मधून तिकीट नाकारले तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे म्हंटले जात आहे. यासाठी त्यांच्या प्रतिनिधीने दिल्लीवरून पिलीभीतला जाऊन नॉमिनेशन पेपरचे चार सेट घेतले. पिलीभीत लोकसभा निवडणूक 2009 आणि 2019 जिंकलेले वरुण गांधी येथून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांच्या तिकीटाबाबत राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत.
पिलीभीत लोकसभा मतदारसंघ वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांच्याकडे गेल्या दीड दशकापासून आहे. 2009 आणि 2019 मध्ये वरुण आणि 2014 मध्ये त्यांची आई मनेका गांधी यांनी आपल्या विजयाने हा गड मजबूत केला होता. मात्र आता वरुण गांधी यांना उमेदवारी न देण्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.
तर मनेका गांधी यांना सुलतानपूर येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही सुलतानपूर व पिलीभीत या दोन्ही मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर न केल्यामुळे या भाजपतील गांधी पर्वाचा शेवट होणार का? हे पहावे लागणार आहे.
सपाकडून भागवत सरन गंगवार यांना संधी Varun Gandhi|
दरम्यान, वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यास ते समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, अशीही एक चर्चा होती. अलीकडेच एक बनावट यादीही व्हायरल झाली होती. ज्यामध्ये वरुण गांधी यांची सपाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आले होते.
मात्र, सपाने ही यादी खोटी असल्याचे जाहीर केले होते. यानंतर बुधवारी सपाने भागवत सरन गंगवार यांना पीलीभीत मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यानंतर वरुण गांधी पीलीभीतमधून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा
महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेला शिर्डी लोकसभा मिळण्याची दाट शक्यता?





