गिरीश महाजन यांच्यासाठी भाजप लावणार फिल्डिंग? नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही

Girish Mahajan | मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर 18 जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आले होते. मात्र नाशिकमधून दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. याप्रकरणी त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे संख्या बळाचा विचार करता राष्ट्रवादीचा पालकमंत्री व्हावा अशी इच्छा आमदारांची होती. तर जेष्ठत्वाचा विचार करता दादा भुसे यांच्याकडे जबाबदारी दिली जावी, असे शिवसेनेला वाटत होते.
मात्र माणिकराव कोकाटे आणि भुसे यांना स्पर्धेतून बाजूला करून गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे साहजिक महायुतीत असंतोष निर्माण झाला. मात्र गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. Girish Mahajan |
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे नेतृत्व ठाम
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्रिपदाबाबत स्वतः बोलणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Girish Mahajan |
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप का आहे आग्रही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी याआधीही नाशिकचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाची गिरीश महाजन यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गिरीश महाजनच प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तिढा निर्माण झाल्याने महायुतीतील वाद समोर आला आहे. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थिगिती दिल्यानंतर शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी हे दोन नेते प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजारोहण करणार असल्याचे निश्चित झाले आहे. Girish Mahajan |
हेही वाचा:
एकीकडे नाराजी तर दुसरीकडे गुप्तभेट ; उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा





