Arvind Kejriwal | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत 2013 पासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे भाजपचा दिल्लीतील 27 वर्षांपासूनचा दुष्काळ संपला आहे. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 60 पेक्षा अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा त्यांचा केवळ 22 जागांवर विजय झाला आहे. मात्र, पक्षाच्या पराभवासोबतच ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. केजरीवाल यांच्यासह आपच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता बनण्याची संधी देखील सध्यातरी केजरीवाल यांच्याकडे नाही. या पराभवानंतर केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य काय असेल? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ते कोणतेही पक्षाव्यतिरिक्त इतर कोणतेही पद नसताना राजकारणात सक्रीय राहू शकतात का? असा प्रश्न विचारला जात आहे. केजरीवाल यांच्याकडे तीन राजकीय पर्याय आहेत, ज्या माध्यमातून ते पुन्हा विधानसभा अथवा संसदेत पोहोचू शकतात. हे पर्याय कोणते आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात. केजरीवाल पुन्हा आमदार होणार का? दिल्लीतील पराभवानंतर आपची सत्ता असलेले पंजाब हे एकमेव राज्य आहे. पंजाबमधील लुधियाना (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे केजरीवाल हे येथून निवडणूक लढवणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, ही केवळ शक्यता आहे. केजरीवाल यांना दिल्ली विधानसभेत जाण्याची देखील संधी आहे. परंतु, यासाठी दिल्लीतील आपच्या एका विद्यमान आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन केजरीवाल विधानसभेत पोहचू शकतात. लोकसभेत जाणार का? केजरीवाल यांच्याकडे लोकसभेत जाण्याचा देखील मार्ग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’चे तीन खासदार पंजाबमधून निवडून आले आहेत. केजरीवाल यांना लोकसभेत पाठवण्यासाठी या तीनपैकी एका खासदाराला राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर लोकसभेत जाण्यासाठी केजरीवाल यांना पोटनिवडणुकीत विजय मिळवावा लागेल. मात्र, आताच झालेल्या पराभवानंतर केजरीवाल पुन्हा निवडणूक लढवण्याची जोखीम स्विकारणार का? हा प्रश्न आहे. राज्यसभेवर निवडून जाण्याची संधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा स्वतःचा जवळपास 4 हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे त्वरित विधानसभा अथवा लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्यावर अनेक आरोप देखील आहेत. अशात राज्यसभा हा एक चांगला पर्याय आहे. परंतु, पंजाबमध्ये राज्यसभेसाठी 2028 मध्ये निवडणूक होणार आहे. तर दिल्लीत 2030 ला निवडणूक होईल. त्यामुळे आपच्या विद्यमान राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिल्यावरच केजरीवाल यांना पुन्हा खासदार होता येणार आहे. पराभवानंतरही ‘आप’कडे मोठी संधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव झाला असला तरीही त्यांच्याकडे मोठी संधी आहे. आतापर्यंत केजरीवाल यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळे ते दिल्लीत अडकून पडत होते. मात्र, आता त्यांच्याकडे पक्षाचा विस्तार करण्याची चांगली संधी आहे. ‘आप’ला गुजरात, हरियाणा, गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. पक्षाला जागा जिंकण्यात अपयश आले असले तरी त्यांची मतांची टक्केवारी अधिक होते. या राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी अरविंद केजरीवाल काम करू शकतात. पुढील काही महिन्यात बिहारमध्ये निवडणूका होणार आहेत. याशिवाय, 2026 मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून केजरीवाल पक्षाचा विस्तार करू शकतात. तसेच, ते सध्या पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेल्यास त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत असेल. त्यामुळे 2028 पर्यंतचा हा कार्यकाळ पूर्णकरण्यासोबतच दिल्लीत होणाऱ्या 2029-30 च्या विधानसभा निवडणुकीवरही लक्ष केंद्रित करू शकतील.