अजित पवार आश्‍वासनांची पुर्तता करणार का?

सत्ताबदलानंतर पहिल्यांदा शहरात; आज आढावा बैठक

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात सत्ता आल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्‍न आपण निकाली काढू, असे आश्‍वासन देणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. 14) पहिल्यांदाच शहरात येत आहेत. त्यामुळे पवार आपल्या आश्‍वासनांची पुर्तता करणार की पुर्वीप्रमाणेच हा विषय चिघळत ठेवणार, या विषयावर ते काय बोलणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान अजित पवार यांनी सांगवी येथे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकरावर भाष्य केले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्ष एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादीला व पर्यायाने अजित पवार यांना महापालिकेतील सत्ता गमवावी लागली.

अनधिकृत बांधकामांवर तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी केलेली धडक कारवाई, आघाडी सरकारच्याच काळात लागू झालेला शास्तीकर यामुळे राष्ट्रवादीपासून शहरवासिय दूरावले. त्याचा फटका बसल्याने महापालिकेत सत्तांतर घडले. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या काळातील हे दोन्ही प्रश्‍न पुर्णपणे निकाली काढण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. त्यातच महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत होत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि भाजपात निर्माण झालेले गट-तट यामुळे भाजपापुढील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत पाहण्यास मिळाला.

या विषयावरच अजित पवार यांनी भाष्य करत आपण शहरातील नागरिकांना भेडसावत असलेला अनधिकृत बांधकामाचा तसेच शास्तीकराचा प्रश्‍न निकाली काढू आणि शहरवासियांना दिलासा देऊ, असे आश्‍वासन दिले होते. सत्ता परिवर्तन होण्यापूर्वी आघाडी शासनाच्या कालावधीत हा विषय जाणिवपूर्वक राष्ट्रवादीकडून झुलवत ठेवण्यात आला होता. आता राज्यात पुन्हा सत्तांतर घडले आहे. तर अजित पवारांनी हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे सत्तांतरानंतर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत “समझोता एक्‍सप्रेस’
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाने सुरू केलेल्या कारभारावर चौफेर टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक मात्र या संपूर्ण प्रकारावर “चुप्पी’ साधण्यातच धन्यता मानत आहेत. अनेकांचे महापालिकेत असलेले ठेके, भाजपाच्या नेत्यांशी असलेले साटेलोटे, व्यावसायिक संबंध तसेच स्वार्थ यामुळे कोणीच काहीही बोलायला तयार नाही. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आक्रमक व्हा, म्हटल्यानंतरही स्थानिक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर समझोता एक्‍सप्रेस चालविण्यातच धन्यता मानली. त्यामुळे अजित पवार आढावा बैठकीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.