Union Budget 2025 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवा स्लॅब तयार होणार ? अर्थमंत्री निर्मला सितारमण मोठ्या घोषणा करणार असल्याची चर्चा

नवी दिल्लीः शुक्रवारी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२४-२५ चा वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. आज सीतारमण या आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
त्यानुसार आता २५ लाखांपर्यंतच्या उत्पनाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे या अर्थसंकल्पाकडे करदात्यांचे विशेष लक्ष लागलेले आहे. त्या आधारावर येत्या आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के इतका असेल असा अंदाज वर्तण्यात आला आहे.
नवीन स्लॅब तयार करणार ?
केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार असून ३१ जानेवारीला पहिला टप्प्याला सुरुवात झाली असून १३ फेब्रुवारीपर्यंत हा टप्पा चालणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिल असा असणार आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पन्नाच्या मर्यादेनुसार जुनी व नवीन करप्रमाणी अस्तित्वात आहे. करदात्यांना त्यांच्या नियोजनानुसार यातील कोणतीही एक पद्धत निवडून त्यानुसार कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आता करदात्यांसाठी नवीन स्लॅब कसा असणार याची उत्सुकता करदात्यांना लागलेली आहे.
मोदींचे सूचक विधान
देशाचे पंतप्रधान यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केलेले विधान सूचक मानले जात आहे. मोदींनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी माध्यमांशी साधलेल्या संवादात लक्ष्मीमातेला नमस्कार करतो. आपल्या संस्कृतीत अशा प्रसंगी देवी लक्ष्मीचं स्मरण केलं जातं, तिला नमन केलं जातं. मी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करतो की देशातील गरीब व मध्यमवर्गावर तिची कृपादृष्टी राहो. त्यांनी केलेल्या या विधानाचा संबंध टॅक्ससोबत जोडला जात आहे. मूळात त्यांचे हे विधान खूप काही बोलून गेले आहे.
मोठ्या घोषणांची शक्यता
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवण्यासाठी यशाची मोठी पराकाष्टा करावी लागली. एक्सिट पोलनुसार देशात भाजपला मोठ्या प्रमाणावर जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, भाजपाला कमी जागा मिळवता आल्या. देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले. नुकत्याच काही राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. यामुळे मध्यमवर्गापासून ते उद्योजकांपर्यंत मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.





