भोर : भोर तालुक्यातील भोंगवली – कामथडी जिल्हा परिषद गटात ४९ वाड्या वस्त्या व गावे आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रस्थापित गेली २५ ते ३० वर्षे सत्तेसाठी तळ ठोकून बसले आहेत. यांच्या विरोधात अनेक नव्या इच्छुकांनी बंड उभे केले आहे. इच्छुक नवे चेहरे आपापल्या कामगिरीवर निवडणुका लढवण्यासाठी मैदानात उतरल्यामुळे प्रस्थापित असलेले मातब्बर सत्ताधाऱ्यांची चांगली धांदल उडाली आहे. त्यामुळे भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटावर ठामपणे कोण उमेदवार निवडून येईल, याची शाश्वती नाही. मातब्बर प्रस्थापितांनी बहुतांशी आपल्या गावचा विकास साधून जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहत आहेत. नवीन इच्छुक उमेदवारांची संख्या जरी गावागावात बहुसंख्य असली तरी ही मंडळी कुठल्या ना कुठल्या कामांमुळे व नावलौकिकामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शह देण्याची ताकद ठेवून निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पुणे जिल्ह्यामधील आजूबाजूच्या तालुक्यातील गावांचा विकास पाहता भोर तालुका अद्याप मागासलेला का ? यातील उणिवा आणि मूलभूत गरजा या प्रस्थापितांना न दिसल्यामुळे इच्छुक उमेदवार हे आक्रमक झालेले आहेत. प्रस्थापित ही मंडळी सोशल मीडियाचा आधुनिकतेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशांची खैरात करून रील बनवणे, छोट्या-मोठ्या गोष्टींचा एआय पद्धतीचा वापर करून दिखाव्याची कामे करीत आहेत. यास प्रस्थापितांनी इतर तालुक्याच्या पद्धतीने आपण विकास का साधू शकलो नाही ? याचा जाब जनता विचारीत आहे. आगामी स्थानिक निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटात चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, रोहन बाठे, महादेव सोनवणे, महेश टापरे, दशरथ गोळे, वैभव धाडवे इच्छुक असून वैभव धाडवे हे पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकाहून अधिक काळ काम केल्याने बहुचर्चेत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षांच्या चाचपणी चालू आहेत. भोंगवली गणात पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागा असल्याने या गणात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अक्षय सोनवणे, गणेश निगडे, उदय शिंदे, शुभम शेटे, मनोज निगडे, धनंजय जगताप तर भाजपाकडून विनोद चौधरी, महेश धाडवे, अनिल साळुंखे, शिवसेना शिंदे गटातून हर्षल बोबडे, पद्मा जाधव, विकास चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटातून निलेश भांडे, सौरभ धाडवे इच्छुक आहेत. कामथडी पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असून नीता इंगुळकर, शशिकला गोरड, सोनम गोळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून भक्ती बोरगे, सुनिता गाडे शिवसेना शिंदे गटातून क्रांती धुमाळ, मनिषा पांगारकर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सारिका मालुसरे, वंदना गोरड, विद्या पांगारे, माया मालुसरे, वैशाली गाडे या इच्छुक उमेदवार आहेत. चौकट : धनशक्ती विरोधात जनशक्ती भोंगवली – कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये नवीन इच्छुक उमेदवारांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात ठसा उमटवल्यामुळे प्रस्थापितांच्या छातीत धडकी भरून आली आहे. या निवडणुकीत हे नवीन चेहरे प्रस्थापितांना भारी पडण्याची शक्यता आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती लाट उसळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.