500 रुपयांच्या नोटा मार्च 2026 पासून बंद होणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली: सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार आहे. इतकेच नाही, तर एटीएममधूनही या नोटांची देवाणघेवाण बंद केली जाईल, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. मात्र, या बातमीत तथ्य किती? केंद्र सरकार आणि पीआयबीने (PIB) याबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे.
काय आहे व्हायरल दावा?
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मार्च २०२६ नंतर ५०० रुपयांच्या नोटा हळूहळू चलनातून बाहेर काढल्या जातील. २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या आठवणी ताज्या असल्याने, या मेसेजमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक युजर्सनी हा मेसेज खातरजमा न करताच शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
RBI to stop ₹500 notes from ATMs by March 2026❓🤔
Some social media posts claim that the Reserve Bank of India will discontinue the circulation of ₹500 notes by March 2026.#PIBFactCheck:
❌This claim is #fake!
✅ @RBI has made NO such announcement.
✅ ₹500 notes have… pic.twitter.com/F0Y3t0wHSf
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 2, 2026
पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) केला खुलासा –
हा संभ्रम वाढत असल्याचे पाहून सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (PIB) च्या फॅक्ट चेक टीमने या दाव्याची पडताळणी केली. पीआयबीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.” रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ५०० रुपयांची नोट पूर्णपणे वैध आहे आणि भविष्यातही ती व्यवहारासाठी सुरूच राहील.
एटीएम आणि ५०० च्या नोटांचे महत्त्व –
सध्या देशातील बहुतांश एटीएममध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक पुरवठा केला जातो, जेणेकरून ग्राहकांना मोठी रक्कम सहज काढता येईल. जर या नोटा चलनातून बाद केल्या, तर रोख रकमेच्या व्यवहारात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही योजना सध्या सरकार किंवा आरबीआयच्या विचाराधीन नाही.
याआधीही पसरल्या होत्या अफवा –
विशेष म्हणजे, ५०० रुपयांच्या नोटांबाबत अशा अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जून २०२५ आणि ऑगस्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत स्पष्ट केले होते की, ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही.
पीआयबी आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही भ्रामक मेसेजवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत सरकारी संकेतस्थळांवर जाऊन त्याची खातरजमा करा.





