पुणे जिल्हा | पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या

परिंचे, (वार्ताहर) – पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोंडकेवाडी, बहिरवाडी, पानवडी, चिव्हेवाडी परिसरात अनेक रानभाज्या बहरल्या आहेत. या परिसरातील नागरिक दैनंदिन जीवनात औषधी वनस्पती व रानभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या परिसरात आढळणार्या रानभाज्या बनवण्याची पद्धत व होणारे उपयोग या विषयावर आदिवासी महिलांकडून माहिती जाणून घेतले असता 15 प्रकारच्या रानभाज्या या परिसरात उपलब्ध असल्याचे आदिवासी महिलांनी सांगितले.
आयुर्वेदात रान वनस्पतींना उपयोग आढळत असून प्रत्येक भाजी तयार करण्याची वेगळी पद्धत आहे. या भाज्या बनवताना कडधान्यांच्या डाळींचा समावेश केला जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्या पूजा चिव्हे यांनी सांगितले.
पावसाळ्यात या रानभाज्या उपलब्ध होतात या काळात पाऊस जास्त असतो शेतातील भात लागणी बरोबर इतर कामे सुरू असतात या काळात बाजारात जाता येत नसल्याने आम्ही रानभाज्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये करत असून मी लहानपणापासून या भाज्या खात असल्याचे 65 वर्षांच्या रत्नाबाई चिव्हे यांनी सांगितले. यावेळी मैनाबाई चिव्हे, निलम चिव्हे या आदिवासी महिला उपस्थित होत्या.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात अनेक आदिवासी खेडी असून ग्रामीण जीवनशैलीचा व त्यांच्या आहाराचा विचार केला असता या रानभाज्या आहारात उपयोग केल्याने या परिसरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याचे पाहायला मिळत असल्याचे या परिसरात काम करणारे रानभाज्या वनस्पती अभ्यासक रोहिदास कोंडके यांनी सांगितले.
रानभाज्यांना शहरात मोठ्या प्रमाणात प्रमाणात मागणी असून या भाज्या शहरापर्यंत पोहोचल्यास त्यांना चांगली किंमत मिळून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.
या भाज्या आढळतात
पुरंदर किल्ल्याच्या डोंगर रांगांमध्ये चिंचारडी, शेंडवळ, कर्टुले, पत्राची भाजी, मोरचवडा, आळींब, चिवळ, रान कुरडू, रान आळू, गायफळ, टाकळ्या, रान भोपळा, तांदूळजा, मायाळू, केना, पाथरी आदी प्रकारच्या भाज्या आढळतात.

