पिंपरी | लोणावळ्याच्या डोंगररांगावर फुलला रानफुलांचा बहर

लोणावळा, {विशाल पाडाळे} – पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा खंडाळा घाटमाथा परिसरातील टायगर लायन्स व शिवलिंग पॉईंट्स तसेच सहारा (ॲंबी व्हॅली) व तेलबैल परिसरात विविध रंगी पर्ण व गवत फुलांचा बहर आला असून, जणु या ठिकाणी कास पठार अवतरले असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणचे फुलांचे ताटवेच्या ताटवे पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांसह राज्यभरातील हजारो पर्यटक गर्दी करु लागले आहेत. दर १२ वर्षांनी बहरणाऱ्या नीलकुरिंजीच्या जांभळ्या रंगाच्या (स्ट्रोबिलेंथेस कुंथीयाना) फुलांसह इतर फुलांच्या ताटव्यांनी लोणावळा व मावळाच्या सौंदर्यात कमालीची भर पडली आहे.
मुंबई-पुणे महानगराच्या मध्यभागी असलेल्या लोणावळा खंडाळा व मावळाला निसर्गाच्या वरदानाबरोबर प्राचीन लेण्यांसह शिवकालीन ऐतिहासिक गड किल्ल्यांचा वारसा लाभला असून, मुबलक पर्जन्यमान व विपुल जल संपदाही लाभली आहे.
तिन्ही ऋतूत येथील नयनरम्य निसर्ग पहाण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात. विशेषतः पावसाळ्यात आकाशाला साद घालणाऱ्या उंच डोंगर दर्यातून खळखळ व झुळझुळ वाहणारे धबधबे (निर्झर) त्या सभोवतालचे विविध रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे व मनमोहक हिरवीगार वनराई,
प्रसन्न व आल्हाददायक वातावरण, वाऱ्याबरोबर सैरभैर धावणारी धुक्याची दुलई आणि विस्तीर्ण अशा निळ्याशार जलाशयांचे महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटकांना लोणावळा खंडाळा व मावळातील पर्यटनस्थळांचे आकर्षण आहे.
त्यामुळे लाखोंच्या संख्येने पर्यटक येथील पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी येतात. विशेषतः पावसाळी पर्यटन व वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते.
या फुलांचे बहरले ताटवे
लोणावळा खंडाळा व मावळ परिसर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या पर्वत रांगेत असल्याने या परिसराला लाभलेल्या विपुल निसर्ग संपदेसह जैवविविधतेचे वरदान लाभले आहे.
या परिसरात पावसाळ्यात नेहमीच विविध रंगीबेरंगी व विविध आकारांची पर्ण व तृण फुलांचे ताटवेच्या ताटवे बहरत असतो.
यामध्ये पिवळी व विविध रंगी सोनकी, तेरडा, कारवी, टोपली कारवी, कुर्डु (कोंबडा), कळी जास्वंद, विविध रंगी घाणेरी, केशरी व गुलाबी कॉसमॉस,
रानहळद (गौराईचे फुल), नभाळी, लाल गोधडी, कानपेट, पिवळी व विविधरंगी पुंगळी, विष्णुक्रांत, संकासुर, मशिपत्री, मद्रास कार्पेट, कोयली, शेरल, रुई, धामण, पळस, वनई (निगडी), उक्षी भांबुर्डा (गंगोत्र), गुलाबी सोनकुसुम, लाजाळू, नोनी, पर्णगुंफी, सोनेरीला,
तांबा, दुधाळी, कळलावी, कांडोळ, पित्तपापड, विविध रंगी प्रची, गवती व विविध रंगी तिळवण, तांदळी, कौलारू (कौली), चिंचणी, मुसळी, गोखरू, घोळ, रानभेंडी, अम्रुल, गावठी बदाम, ऑर्किड, मेहेंदी, पांढरा कुडा, विंचवी, निळी चिराईत, सर्पकंद, बुरुंडी, आभाळी, तीलांबरी, सीतेची आसव, ताग, गोलकुंडा धोत्रा चवर वनरागी अशा प्रकारच्या ज्ञात व अज्ञात फुलांचा समावेश आहे.
१२ वर्षांनी नीलकुरिंजीचे दर्शन
मात्र, १२ वर्षांनी बहरणाऱ्या नीलकुरिंजी (स्ट्रोबिलेंथेस कुंथीयाना) फुलांच्या बहरलेल्या ताटव्यांनी तर जैवविविधतेचे दर्शन घडवत किमया केली. नीलकुरिंजी (स्ट्रोबिलेंथेस कुंथीयाना) हि एक मोनो कार्पिक वनस्पती आहे. या फुलांना बहर येण्यास ऑगस्टला सुरुवात होते.
याचा बहर ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतो. ही फुले भारतात महाराष्ट्रातील पश्चिम घाटमाथा व सह्याद्रीच्या पर्वतरांगेसह भारतातील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथील जंगलातील घाटमाथा व पठारावर आढळतात. नीलकुरिंजी फुल वनस्पती जगातील अनेक दुर्मिळ फुलांपैकी एक आहे.
विशेष म्हणजे यांची फुले दर १२ वर्षातून एकदा फुलतात. या फुलांचे सौंदर्य पहाण्यासाठी पुन्हा १२ वर्षांनी दीर्घकाळ वाट पहावी लागते.
हि फुले कारवीच्या फुलांसारखी तसेच हि वनस्पती टोपली कारवीसारखी दिसते. सुरुवातीला हि कारवीची फुले असल्याचा भास होतो. या फुलांसह इतर फुलांच्या ताटव्यांनी येथील माळरान, टेकड्या, डोंगर पठारांचे सौंदर्य बहरून आले आहे.
हि फुले पहिल्यांदाच या परिसरात बहरल्याने स्थानिकांसह पर्यटकांना याचे कुतूहल वाटू लागले. फुलांच्या बहलेल्या ताटव्यांची माहिती वाऱ्यासारखी पसरताच फुलांचे ताटवे पहाण्यासाठी लोणावळा खंडाळा व मावळ मुळशीतील नागरिकांसह राज्यभरातील पर्यटकांची पाऊले लोणावळा परिसरातील टायगर, लायन्स व शिवलिंग पॉईंटच्या दिशेने चालू लागली आहे.
प्रत्येकजण या फुलांच्या ताटव्यात उभे राहून व बसून आपली छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
आपल्या सभोवतालच्या नयनरम्य निसर्गाचा व जैवविविधतेचा आनंद लुटताना प्रत्येकाने आपल्या निसर्ग व जैवविविधतेला हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच येथील फुलांच्या ताटव्यांसह गवताळ रानातून जाताना सरपटणारे प्राणी श्वापदे यांच्याकडे लक्ष देऊन स्वतःसह इतरांच्या जिवीताची काळजी घ्यावी.
तसेच काही अतिउत्साही जे पर्यटक जैवविविधतेतून आपली वाहने घेऊन जाऊन जैवविविधतेला हानी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. निसर्ग व जैवविविधतेच्या संवर्धना संदर्भात पर्यटकांसाठी ठिक ठिकाणी सूचनाफलक लावण्यात येणार असून वन विभागाची गस्त वाढविण्यात येणार आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रोजंदारी मजूर नेमण्यात येणार आहेत. सदर ठिकाणी कचरा होणार नाही, याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी. तसेच वनविभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सदर पर्यटन स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी व अतिउत्साही पर्यटकांवर आळा घालण्यासाठी वनविभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात आली असून, याठिकाणी धांगडधिंगा घालून जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एम. एस. हिरेमठ (वनपाल लोणावळा -अतिरिक्त कार्यभार ) यांनी दिला आहे.





