Hingoli News : हिंगोलीत पोलिस कर्मचाऱ्याकडून पत्नीचा खून; सासू व मेहुणा गंभीर जखमी

हिंगोली : हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून खून केल्याची घटना बुधवारी (ता. २५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याचे हिंगोली येथील प्रगतीनगर भागात घर आहे. आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी आला असतांना त्याने पिस्टलमधून पत्नी मयुरी विलास मुकाडे यांच्यावर गोळी झाडली त्यानंतर सासू वंदना धनवे व मेहूणा योगेश धनवे (दोघे रा. वाई) याच्यावरही गोळीबार केला. यामध्ये वंदना व योगेश गंभीर जखमी झाले तर मयूरी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
या घटनेतील जखमी वंदना व योगेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मयत मयुरी यांचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.आहेत.
या बाबत पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिलेल्या.माहितीनुसार, मयुरी मुकाडे यांचा मृतदेह घरात पडलेला असून वंदना धनवे व योगेश धनवे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विलास हा पळून गेला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस सर्व बाजूंनी माहिती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात गोळीबार करणारा पोलिस कर्मचारी विलास हा हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी येथील रहिवासी असून सन २०१४ मध्ये पोलिस दलात भरती झाला होता. त्यानंतर तो मुख्यालयात कर्तव्यावर होता. तर एक वर्षापुर्वीच त्याची वसमत शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. आज सकाळी तो पोलिस ठाण्यात आला होता अशी माहिती वसमत शहर पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.







