Wifa Storm : विफा वादळामुळे हॉंगकॉंगमध्ये विमान सेवा विस्कळीत

हॉंगकॉंग : विफा चक्रिवादळामुळे हॉंगकॉंग आणि चीनमधील विमानसेवा रविवारी विस्कळीत झाली. हे चक्रिवादळ आज चीनच्या दक्षिण किनारपट्टीच्या पश्चिमेकडे सरकले आहे. वादळामुळे हॉंगकॉंग, शेन्झेन, झुहाइ आणि मकाउ येथील विमानतळांवरील विमानांची उड्डाणे लांबणीवर टाकली गेली. वादळामुळे येत असलेल्या पावसामुळे हॉंगकॉंगमधील रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली होती.
हॉंगकॉंगमधील हवामान निरीक्षण संस्थेने वादळाशी संबंधित १० क्रमांकाचा सर्वाधिक तीव्रता दर्शवणारा इशारा जारी केला आहे. चक्रिवादळ हॉंगकॉंग शहराच्या दक्षिणेकडे सरकत असून वादळाची तीव्रता सध्या सर्वाधिक पातळीवर असल्याचे म्हटले आहे. वाऱ्याचा वेग ताशी १४० किलोमीटर इतका असल्याचे हवामान निरीक्षण संस्थेने म्हटले आहे. वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी किमान २०० लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.
शहरातडझनभर ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले हॉंगकॉंगमधील डिस्नेलॅन्ड आणि अन्य अम्युजमेंट पार्क सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. रात्रभरात विफा चक्रिवादळाचे रुपांतर अतिशक्तिशाली चक्रिवादळामध्ये झाले असून हे वादळ रविवारी संध्याकाळपर्यंत पश्चिमेकडील मकाउ आणि शेजारील चीनमधील झुहाई शहराच्या दिशेने सरकते आहे. हे वादळ या आठवड्यात व्हिएतनामला धडकण्याची शक्यता आहे.
फिलिपिन्समध्ये मोठे नुकसान
या वादळाचे विफा हे नामकरण थाई भाषेतून केले आहे. फिलिपिन्स ओलांडून हे वादळ शनिवारी तैवानच्या खाडीतून पुढे सरकले आहे. फिलिपिन्समध्ये या वादळाने जोरदार पर्जन्सवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील कागायान प्रांतात आलेल्या पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. वादळी हवामानामुळे फिलिपिन्समध्ये किमान ३ लाख ७०,००० हून अधिक लोक प्रभावित झाले, पूर, भूस्खलन आणि जोरदार वाऱ्यामुळे सरकारी आपत्कालीन आश्रयस्थानांमध्ये ४३,००० लोकांनी आश्रय घेतला आहे. या वादळामुळे ४०० हून अधिक घरांचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





