Walmik Karad : कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या लातूरातील आलिशान बंगल्याच काम का थांबवल?

पुणेः खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आणि नंतर मकोका लावण्यात आलेल्या आरोप वाल्मीक कराडबद्दल दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावे असलेल्या मालमत्तेची माहिती उघड झाली होती. पुण्यातील पिंपरी चिंडवड, फर्ग्यूसग कॅालेज रोड आणि हडपसर भागात असलेली कोटीवधी रुपयांची मालमत्तेची माहिती उघड करण्यात आली होती. आता या संपत्ती प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर आली आहे.
कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या म्हणजेच ज्योती मंगल जाधव यांच्या नावे तब्बल साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात ही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच लातूरमध्येही कराडच्या या दुसऱ्या पत्नीच्या नावाने आलिशान बंगला आणि कोट्यावधींची प्रॅापर्टी असल्याचे समोर आले आहे. लातूर शहरातील महापालिकेच्या हद्दीतील न्यू सरस्वती कॅालनी भागात आलिशान बंगला असल्याचे समोर आले आहे. मात्र, या आलिशान बंगल्याचे काम थांबवण्यात आले आहे.
दुसऱ्या पत्नीच्या नावे साडेसतरा कोटींची मालमत्ता
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराचा आरोप करण्यात आलेल्या वाल्मीक कराडच्या दोन्ही पत्नीच्या नावे असलेली मालमत्तेची माहिती उघड झाली आहे. पहिली पत्नी मंजिरी यांच्या नावावर सव्वाचार कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. दोन्ही मिळून साधारणपणे पावणे बावीस कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अजूनही काही संपत्ती वा मालमत्ता आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात संतापाची लाट आहे. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराडवर आरोप केले जात आहेत. या प्रकरणामुळे लातूर शहरातील कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे असणाऱ्या आलिशान बंगल्याचे काम तातडीने थांबवण्यात आले आहे. आमदार सुरेश धस हे या प्रकरणावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. धस यांनी केलेल्या आरोपानंतर कराडच्या पत्नीच्या नावावर असलेल्या प्रार्टीजची माहिती उघड झाली.





