जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा? – नारायण राणे

मुंबई – जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही, असा मुख्यमंत्री हवाच कशाला, अशा शब्दांत खरपूस समाचार घेत भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.

हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. पण मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही. त्यामुळे हे सरकार खरंच अस्तित्वात आहे का, जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा, असे अनेक प्रश्‍न राणेंनी यावेळी उपस्थित केले. तसेच ते प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात करोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, असेही राणे यावेळी म्हणाले.

राज्याची दयनीय अवस्था असताना मुख्यमंत्री केवळ डोळे मिटून लॉकडाऊन करा एवढेच बोलत आहेत, असेही राणे म्हणाले. गेल्या चार महिन्यांत सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेले आहे. अनेकांचे पगार होत नाहीत. निसर्ग चक्रीवादळ झालं, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, अशीही टीका राणेंनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.