फिटर असूनही वाहन दुरुस्तीचे “आऊटसोर्सिंग’ का?

महापालिकेच्या वाहन विभागाचा प्रताप उघड : स्पेअरपार्ट खरेदीबाबत प्रश्‍नचिन्ह

पुणे  – महापालिकेच्या वाहन विभागकडे 100 हून अधिक फिटर असताना; अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम खासगी मोटार कंपनीस देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, यासाठी प्रशासन दरवर्षीच कोट्यवधी रुपयांची स्पेअरपार्ट खरेदी करत आहे. त्यामुळे जर खासगी कंपनी देखभाल-दुरुस्ती करत असेल, तर पालिकेचे स्पेअरपार्ट कोठे जातात? असा प्रश्‍न समोर आला आहे.

महापालिकेच्या ताफ्यात सुमारे 900 वाहने आहेत. यामध्ये चारचाकींसह, टेम्पो, कचरा वाहतुकीची वाहने तसेच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची वाहने आहेत. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र वाहन विभाग असून या विभागाकडूनच वाहनांचे संचलन, त्यासाठी आवश्‍यक साहित्य, स्पेअरपार्ट आणि देखभाल दुरूस्ती केली जाते. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजले जातात. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले प्रमुख वाहन “ऍम्बेसिडर’ आहे. त्यांची देखभाल-दुरुस्ती महापालिकेचे फिटरही करतात. तसेच त्याचे साहित्यही पालिका या पूर्वी खरेदी करत होती. पण, आता या वाहनांच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक यंत्रणा नसल्याचे सांगत एका खासगी कंपनीस पालिकेकडून हे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे ऑफिस येवलेवाडी येथे असून त्यांच्याकडे इतर शासकीय कार्यालयांची वाहनेही दुरूस्तीसाठी येतात. तर तेथे एकदा वाहन सोडल्यानंतर ती वेळेत मिळत नाही. तसेच काय काम केले याबाबत माहिती चालकांना न देता, कोरे कागद तसेच इंग्रजी माहितीच्या अर्जांवर सह्या केल्या जातात. नंतर ही बिले वाहन विभागाला पाठविली जातात. ती कोणतीही तपासणी न करताच मंजूरही होतात.त्यामुळे खासगी कंपनीचे खिसे भरण्याचा घाट घातल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

परवडत नसतानाही अट्टहास
“ऍम्बेसिडर’चे आयुर्मान काही वर्षांचे राहिले आहे. त्यामुळे या कारमधील बिघाड तसेच नादुरुस्तीचे प्रमाण लक्षणीय आहे. वर्षाला या प्रत्येक वाहनावर काही लाखांत खर्च केला जातो. त्यामुळे एका गाडीचा दोन वर्षांचा देखभाल दुरुस्तीच्या खर्चात नवीन वाहन येणे शक्‍य आहे. मात्र, या देखभाल दुरुस्तीमधून अनेकांचे खिसे गरम होत असल्याने तीच वाहने वारंवार दुरुस्त करून वापरले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)