दिल्लीतील केदारनाथ मंदिराच्या उभारणीला का होतोय विरोध? जाणून घ्या कारणे…

Kedarnath temple in Delhi | दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या केदारनाथ मंदिराच्या बांधकामाला उत्तरखंडमधून विरोध केला जात आहे. पुजाऱ्यांपासून ते स्थानिक लोकांकडून दिल्लीतील केदारनाथ मंदिर बांधण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे. बद्रीनाथ धामचे शंकराचार्य अवि मुक्तेश्वरानंद यांच्यासह धामचे मुख्य पुजारीही याला विरोध करत आहेत. यावरुन काँग्रेसने राज्य सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
काय नेमकं प्रकरण ?
दिल्लीतील बुरारी येथील केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. या मंदिराचा भूमिपूजन सोहळा 10 जुलै रोजी पार पडला. हे मंदिर श्री केदारनाथ धाम ट्रस्ट बुरारी द्वारे बांधले जात आहे. तीन एकरावर हे मंदिर बांधले जाणार असल्याचा दावा केला जात आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 6 महिने बंद असल्याने हे मंदिर उभारले जात असल्याचे सांगितले जात आहे. Kedarnath temple in Delhi |
दिल्लीतील या मंदिराला का होतोय विरोध?
केदारनाथ धामचे तीर्थ पुरोहित पुजारी संतोष त्रिवेदी म्हणाले की, याद्वारे हिंदू परंपरांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सहन केले जाणार नाही. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा देशात मोठे आंदोलन उभे केले जाईल. हा सनातन आणि वैदिक परंपरेसह हिंदू धर्माचा अपमान आहे.
दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या केदारनाथ मंदिराबाबत वाढत चाललेला वाद पाहता श्री केदारनाथ धाम ट्रस्ट बुरारी (दिल्ली)चे अध्यक्ष सुरिंदर रौतेला यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, केदारनाथ मंदिर दिल्लीत बनत आहे, धाम नसून तेट्रस्टद्वारे बांधले जात आहे. त्याचा उत्तराखंड सरकारशी काहीही संबंध नाही. मंदिराच्या पायाभरणीसाठी आमच्या निमंत्रणावरूनच मुख्यमंत्री आले होते.
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी म्हटले आहे की, दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या मंदिराशी मंदिर समिती किंवा सरकारचा काहीही संबंध नाही. काँग्रेस नेते या प्रकरणाला अनावश्यक महत्त्व देत आहेत. संबंधित संस्थेने केदारनाथ धामच्या नावाचा गैरवापर केल्यास किंवा त्याच्या नावावर देणग्या घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. Kedarnath temple in Delhi |
हेही वाचा:





