“जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही? शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना”; राऊतांची टीका

मुंबई – शिवसेनेकडून (शिंदे गट) एक जाहिरातबाजी करण्यात आली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीला राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असं शीर्षक देण्यात आले आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च समजत राष्ट्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे म्हंटले जात होते. मात्र या जाहिरातीवरून शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे दाखवण्यात आल्याचे दिसते. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना असल्याचे म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो जाहिरातीत दिला, पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही नाही. त्यामुळेच ही शिवसेना नसून मोदी शाह यांची सेना आहे हे स्पष्ट झाले आहे. रोज बाळासाहेबांच्या नावाने जी पोपटपंची सुरु आहे ना? त्यांचा मुखवटा उघडा पडला आहे. एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे. अमित शाह यांची सेना आहे.”
कोट्यवधींची जाहिरात सरकारी आहे की खासगी?
“बाकी सर्व्हेबाबत आम्ही काही बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी नेते उत्तर देतील. एकनाथ शिंदेंचा गट आणि भाजप यांनी एकमेकांमध्ये कुस्ती, मल्लखांब, खोखो खेळावा आम्हाला काही घेणं देणं नाही. आज जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली कोट्यवधींची जाहिरात ही सरकारी आहे की खासगी?, हे आधी सरकारने स्पष्ट करावे. ही जाहीरात जर सरकारी असेल तर भाजपच्या ज्या 105 आमदारांच्या बळावर शिंदे सेनेने सरकार स्थापले आहे, त्या आमदारांपैकी एकालाही जाहीरातीमध्ये स्थान का दिले नाही, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांनीच दिले पाहीजे. ”
एका जाहीरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोन हजारच्या नोटा चलनात आणण्यासाठी तर ही धावपळ नाही. त्यामुळेच तर दोन हजारांच्या नोटा फस्त केल्या जात नाहीत ना?, असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.





