Ajaz Khan: चित्रपट अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोवरून गोंधळ का होतोय?

Ajaz Khan: बॉलिवूड अभिनेता आणि ‘बिग बॉस ७’चा माजी स्पर्धक एजाज खान याचा उल्लू अॅपवरील रिअॅलिटी शो ‘हाउस अरेस्ट’ अश्लील सामग्रीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोमधील कथित अश्लील दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) खान आणि उल्लू अॅपचे सीईओ विभु अग्रवाल यांना ९ मे रोजी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. या शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असून, राजकीय नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शोवरील अश्लीलतेला ‘सामाजिक मूल्यांवरील हल्ला’ संबोधत तात्काळ बंदीची मागणी केली. त्यांनी एक्सवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये खान स्पर्धकांना अशोभनीय कृतींसाठी प्रोत्साहन देताना दिसतात. वाघ म्हणाल्या, “हा शो अश्लीलतेची पराकाष्ठा आहे. सूचना आणि प्रसारण मंत्र्यांनी उल्लू अॅपसह अशा सर्व अॅप्सवर बंदी घालावी.” त्या पुढे म्हणाल्या की, अशा शोमुळे तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही एक्सवर लिहिले, “हा प्रकार चालणार नाही. आमची संसदीय समिती यावर कारवाई करेल.” शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेच्या स्थायी समितीत उल्लू अॅप आणि ऑल्ट बालाजीवरील अश्लील सामग्रीचा मुद्दा उपस्थित केला असून, मंत्रालयाच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनीही खान यांच्यावर टीका करत, “मुस्लिम असून असा शो करणाऱ्या एजाजवर एफआयआर दाखल करून शो बंद करावा,” अशी मागणी केली.
२९ एप्रिल रोजी शोची एक क्लिप वायरल झाली, ज्यामध्ये खान महिला स्पर्धकांना अश्लील टास्क आणि कपडे उतरवण्यास सांगताना दिसतात. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. NCWने याला ‘महिलांच्या सन्मानाविरुद्ध आणि यौन शोषणाला प्रोत्साहन देणारा’ ठरवले आहे. यामुळे मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यात खान आणि निर्माते राजकुमार पांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
वाढत्या दबावामुळे उल्लू अॅपने ‘हाउस अरेस्ट’चे सर्व एपिसोड्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत. खान यापूर्वीही २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये ड्रग्ज आणि हेट स्पीच प्रकरणांमुळे अटकेत होता. या वादावर खान यांनी, “गेम खेळायचं असेल तर आपसात खेळा, माझ्याशी खेळू नका,” अशी प्रतिक्रिया एक्सवर दिली.
शोच्या स्पर्धक गहना वशिष्ठ यांनी मात्र खान यांना समर्थन देत, “प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये कपडे उतरवते, तेव्हा अश्लीलता का नाही?” असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाने ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील नियमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.





