Pune : “महायुती सरकार हाच का तुमचा न्याय ?’

पुणे : शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांची महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, पुण्यात राठोड यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या वर “राठोड यांचा डाग शिंदेच्या कपाळी’ असे नमूद करण्यात आले आहे. शहरात अनेक भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
तीन वर्षांपूर्वी पुण्यात एका युवतीच्या मृत्यूप्रकरणी महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री असलेल्या राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, राज्यात घडलेल्या सत्ताबदलाच्या नाट्यानंतर राठोड हे शिंदे यांच्यासोबत गेले.
आता राज्यात महायुती सरकारमध्येही शिंदे यांच्या कोट्यातून आमदार राठोड यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यावरून पुण्यात पोस्टरबाजीमधून राठोड तसेच महायुतीवर निशाणा साधण्यात आला आहे.
“एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण, दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या मृत्यू प्रकरणात आरोप असणाऱ्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद. महायुती सरकार हाच का तुमचा न्याय ?’ असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे.





