चाकण : मागील 20 वर्षांपासून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने वैतागलेल्या चाकणकर नागरिकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. खासदार साहेब आता तरी चाकणची कोंडी सोडवा अशी मागणी करण्यात येत आहे; मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांच्या मागणी (?) कडे दुर्लक्ष होत आहे की खासदार काम करीत नाही की विरोधात मतदान केले म्हणून मुद्दाम स्थानिकांना वेठीवर धरले जात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पुणे-नाशिक व तळेगाव शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी झाली आहे का ?
यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुगल मॅपवर माहिती घेऊन प्रवासाचा निर्णय घयावा लागतो, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चाकणमधील प्रवास नकोसा वाटत आहे. चाकण-शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने अवजड वाहनांसह चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सातत्याने सुरू असते. त्याचबरोबर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला मिळत असतानाही या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न अजूनही सुटला नाही. यामुळे याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसत असल्याने कंपन्या-उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड या पर्यायाचा शासनाकडून गांभीर्याने विचार करण्यात येतोय. राष्ट्रीय हमरस्त्यावर सातत्याने जाणवणार्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडी) चाकण बाह्यवळण मार्गाची रचना केली; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते काम प्रलंबित असून सध्या तरी वाहतूक कोंडीतून मार्ग शोधत इच्छितस्थळी पोहोचणे याशिवाय वाहनचालकाला पर्याय नाही. चाकण व परिसरातील नागरिकांसाठी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीमुळे अपघातच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असून रुग्ण मृत्यूसह अपघाती मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
वल्गना, आश्वासने झाली परंतु…
चाकणची वाहतूक कोंडी कोण सोडवणार ? हा प्रश्न गेली कित्येक वर्षे अनुत्तरितच आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांनी मोठ्या वल्गना केल्या, कामांच्या घोषणा झाल्या आणि आश्वासने झाली; परंतु प्रत्यक्षात काहीच काम होत नाही हे दुर्दैव. निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु चाकणकर नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
प्रस्ताव रखडलेला?
मराठवाडा विभागाशी जोडल्या जाणार्या चाकण-शिक्रापूर मार्गावरील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी मार्गे पुणे-नाशिक हा रस्ता असा बाह्यवळण मार्ग तीन ते चार किलोमीटर अंतराचा आहे. या प्रस्तावित मार्गावर अनेक शेतकरी बाधित होत असून काही शेतकर्यांनी याबाबत मंजुरी दिली तर काही शेतकर्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या मार्गावर आधुनिक पद्धतीने मोजणी देखील झाली आहे; परंतु अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव रखडला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे
पुणे-नाशिक महामार्गावर मोई, चिंबळी, कुरुळी, बर्गे वस्ती, एमआयडीसी, आळंदी फाटा, तळेगाव, आंबेठाण चौक, वाकी, रोहकल फाटा ही वाहतूक कोंडीची ठिकाणे झालेली आहेत. वाहतूककोंडी काही नागरिकांचा, प्रवाशांचा, वाहन चालकांचा पिच्छा सोडत नाही. अगदी एक, दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना एक, दोन तास लागतात ही भयानक अवस्था आहे.