What is AB Form | महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत आहेत. हा फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची देखील धडपड सुरू असते. निवडणूक प्रक्रियेत ‘एबी फॉर्म’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे ‘एबी फॉर्म’ हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. हा ‘एबी फॉर्म’ ज्याला मिळतो त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले जाते. दोन वेगळ्या प्रकारचे फॉर्म निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गणले जाण्यासाठी आणि त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी ‘एबी फॉर्म’ सादर करणे बंधनकारक असते. जर एखाद्या उमेदवाराने पक्षाच्या नावाने अर्ज भरला पण एबी फॉर्म दिला नाही, तर त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळत नाही. त्याला अपक्ष मानले जाते. यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये हा फॉर्म मिळवण्यासाठी मोठी चढाओढ असते. मुळात हे दोन वेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात. ‘एबी फॉर्म’ म्हणजे काय? What is AB Form | उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात ‘एबी फॉर्म’ हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ द्यावाच लागतो. तो ‘एबी फॉर्म’ सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही. या फॉर्मच्या आधारेच उमेदवाराला पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह दिले जाते. उमेदवाराला स्वतंत्र दोन फॉर्म भरणं अनिवार्य आहे. यामध्ये पहिला फॉर्म म्हणजे, फॉर्म A आणि दुसरा म्हणजे फॉर्म B. या दोन्ही फॉर्म्सना एकत्रितपणे AB फॉर्म असं म्हटलं जातं. ‘ए फॉर्म’ हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे. मान्याताप्राप्त राष्ट्रीय किंवा प्रादेशिक राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची ओळख पटवणारा ही ए फॉर्मद्वारे होते. या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का व तिकीट वाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची स्वाक्षरी असते. त्याचबरोबर त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. ‘बी फॉर्म’ का दिला जातो? तर ‘बी फॉर्म’वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो. पडताळणीवेळी अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो. हेही वाचा: उत्तराखंडच्या अल्मोडात भीषण अपघात ; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून ७ ठार