पुणे | एसी बस अस्वच्छ का ? प्रवाशांना होतोय त्रास

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीच्या ताफ्यात ई-बस आल्या आणि प्रवास वातानुकुलीत झाला. प्रवाशांचाही या ई-बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ई-बसमध्ये स्वच्छता होत नसल्याचा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहे. त्याकडे पीएमपी प्रशासन आणि ठेकेदाराचे लक्ष नाही का? बसची स्वच्छता करण्यास आळस का असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमपएल) ताफ्यात पाचशे ई-बस आहेत. या सर्व बस ठेकेदारामार्फत चालविल्या जाता. या ई-बसच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांना सेवा दिली जाते.
ई-बसमधून महिन्याला साधारण एक कोटींपेक्षा जास्त आणि दिवसाला जवळपास साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ई-बसची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यापूर्वी देखील काही प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर पीएमपी प्रशासनाकडून बस स्वच्छ करूनच मार्गावर सोडण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे काही दिवस सूचना पाळल्यानम्तर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.
आजही ई-बसमध्ये अस्वच्छता, धूळ असणे, हँडल तुटलेली असणे, सीट खराब अशा तक्रारी वाढल्या आहेत. ई-बसमध्ये एसी सुरू होताच धुळ उडते आणि नागरिकांना त्रास होतो. त्यात पावसाळा असल्यामुळे ई-बसमध्ये माती येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
त्यामुळे स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत. पीएमपी प्रशासनाकडून ई-बसच्या ठेकेदारांना नियमितपणे कराराप्रमाणे पैसे दिले जातात. पण, त्यांच्याकडून सेवा व्यवस्थित दिली जाते का याकडे पीएमपीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होते, अशी विचारणा प्रवाशांकडून होत आहे.

